Bihar Election 2020 : तेजस्वी यादवांच्या सभांना गर्दी वाढली, बिहार निवडणुकीला रंग चढू लागला

पाटना – बिहामधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आता अधिकाधिक रंगतदार होऊ लागला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि मुख्य मंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

बिहारमधील विद्यमान मुख्य मंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजप यांची युती विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे महागठबंधन यांच्यात विधानसभेच्या २४३ जागांसाठी लढत होत आहे. नितीश कुमारच मुख्य मंत्री रहातील असे भाजपने जाहीर केले आहे. तेजस्वी यादव हे मुख्य मंत्री पदाचे उमेदवार असतील असे महागठबंधनने जाहीर केले आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर यादव यांनी वातावरण ढवळून काढले आहे. तर, विकासाच्या मुद्द्यावर नितीश कुमार ठाम आहेत. एरवी नितीश कुमार यांना निवडणूक सोपी वाटत होती पण, गेल्या दोन-तीन दिवसात तेजस्वी यादवच्या सभांना गर्दी वाढू लागल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

बिहारमधील निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी, ७१ मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तशी प्रचाराची रंगत वाढत जाईल.