‘कामाख्या’च्या रुपातील फोटो शेअर करत तेजस्विनी पंडितनं मांडला लाख मोलाचा प्रश्‍न ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या उत्सवात नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या वेगळ्या 9 रुपात समोर येताना दिसत असते. यावेळीही तिने यात सातत्य ठेवलंय. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तेजस्विनी अनेक प्रश्न मांडताना दिसतेय. पहिल्या दिवशी तिने अंबाबाईच्या रुपात फोटो शेअर करून महत्त्वाचा प्रश्न मांडला होता. आता दुसऱ्या दिवशी तेजस्विनीने कामाख्याच्या रुपातील फोटो शेअर करून पुन्हा एक प्रश्न मांडलाय.

कामाख्या रुपाचं महत्त्व सांगत तेजस्विनीने महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. तेजस्विनीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणे टाळावे. जिथे नदीला देखील अशा प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ?” असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी ती देवीच्या रुपातील एक फोटो शेअर करत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनोख्या कलाकृती शेअर करत ती अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालतेय. आता तिसऱ्या दिवशी ती कोणत्या रुपात दिसणार आणि काय प्रश्न मांडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com