दुर्देवी ! 150 फूट खोल बोअरवेल, NDRF कडून 13 तास ‘रेस्क्यू’ ऑपरेशन, 3 वर्षाच्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी

पोलिसनामा ऑनलाईन – तेलंगणातील मेडक इथे बोअरवेलमध्ये पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पोलीस आणि एनडीआरएफकडून जवळपास 13 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. मात्रा, त्यांच्या प्रयत्नानंतरही चिमुकला वाचू शकला नाही. ही घटना पापन्नापेट मंडल इथल्या पोड्चना पल्लीगाव इथली आहे.

चिमुकला आजी-आजोबांकडे आला होता. खेळता खेळता पाय घसरून हा चिमुकला थेट बोअरवेलमध्ये गेला. मुलगा खूप वेळेपासून कुठे दिसत नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर बोअरवेलमधून त्यांना आवाज आला. पालकांनी तातडीने माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मुलाला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबी, दोन क्रेन आणि तीन रुग्णवाहिका आणि दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या.

https://twitter.com/SairamAnupoju_1/status/1265657662760509440

हैदराबादहून बचाव कार्यासाठी एक विशेष पथकही बोलवण्यात आले होते. मात्र चिमुकल्याने तोपर्यंत प्राण सोडले होते. स्थानिक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार बोअरवेल खोदण्याचे काम बुधवारी कऱण्यात आले होते. 120 ते 150 फूट खोल ही बोअरवेल असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी एनडीआरएफ आणि पोलिसांनी चिमुकल्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.