हैदराबात गँगरेप प्रकरणाचा निषेध करणाऱ्या भाजप नेत्याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद गँगरेप प्रकरणामुळे देश हादरून गेला असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी अनेकांनी आंदोलन केले. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलेल्या भाजपच्या नेत्यालाच तेलंगणा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून या नेत्याने अटक होण्याच्या एक दिवस आगोदर हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते. अशिष गौड असे तरुणाचे नाव असून तो भाजपाच्या युवा मोर्चाचा सभासद तसेच भाजप आमदार नंदेश्वर गौड यांचा मुलगा आहे.

अशिष गौड याच्याविरोधात रविवारी एका मॉडेलने पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अशिष गौड याला अटक केली आहे. हैदराबादमधील हॉटेल मधापूर येथे आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अशिष सहभागी झाला होता. आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची पोस्ट अशिष गौड याने फेसबुकवर टाकली होती.

मात्र, या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानतंर दुसऱ्याच दिवशी आशिषला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अशिषवर आरोप करणाऱ्या मॉडेलने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हॉटेलमध्ये अशिष आणि त्याच्या इतर दोन मित्रांनी काही मुलींची छेड काढली. शहरामध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असताना पोलिसांनी दुसरीकडे भाजप आमदाराच्या मुलाला अटक केली आहे.