मला मत द्या… आश्वासनं नाही पूर्ण झाली तर याच जोड्यानं हाणा…!

तेलंगणा : वृत्तसंस्था – निवडणूका आल्या की उमेदवार मतदारांच्या घरांचे  उंबरे  झिजवतात. निवडून आल्यावर मात्र तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत किंबहुना जी आश्वासने ते देतात ती पूर्ण केली जात नाहीत. असा आरोप नेत्यांवर नेहमीच केला जातो. पण यंदाच्या निवडणूक प्रचारात एका उमेदवाराने प्रचाराची नामी शक्कल लढवली आहे. हा उमेदवार आश्वासन पूर्तीच्या यादीसोबत नागरिकांना चप्पल देत आहे. ” मला मत द्या ,मी जर आश्वासन पूर्ण केलं नाही तर ,हीच चप्पल घेऊन मला हाणा ” असे या उमेदवाराचे म्हणणे आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचे चार दिवस उरले आहे. २८ नोव्हेंबरला इथं मतदान होणार आहे. ११३ जागांसाठी इथं मतदान होणार आहे. ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तेलंगाणा येथील कोरतला येथील हा उमेदवार आहे. अपक्ष म्हणून हा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा आहे.अकुला हनुमंत असे या उमेदवाराचे नाव आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू यापुढे जाऊन मद्य, कोंबडी, देवदर्शनाचे आमिष दिल्याचे तुम्ही ऐकले आणि पाहिले असेलच पण तेलंगणातल्या अकुला हनुमंत या उमेदवाराने नामी शक्कल लढवली आहे. अकुला हनुमंत हे आपल्या मतदारसंघातील मतदारांची भेट घेऊन चपल भेट देत आहे.मतदारांना भेटण्याआधी हनुमंत हे आश्वासनाचे पत्रक हाती सोपवतात.त्यानंतर आपल्यासोबत आणलेल्या बाॅक्समधून एक चपल भेट देतात. हे पाहून मतदारही गोंधळात सापडले आहेत .यावर हनुमंत म्हणतात, तुम्ही जर मला निवडून दिलं तर दिलेली सगळी आश्वासनं मी पूर्ण करेन. आता त्यांच्या या नामी युक्तीवर मतदार राजा नक्की यांना मत देतो की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण या चप्पल वाटणाऱ्या उमेदवाराची चांगलीच चर्चा सुरु आहे.