तेलंगणाच्या आमदारानं ‘लॉकडाऊन’ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला ‘वाढदिवस’, हायकोर्टानं पाठविली नोटीस

नवी दिल्ली. वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा आहे. लॉकडाऊन दरम्यान गृह मंत्रालयाची कठोर मार्गदर्शक सूचना होती की यात कोणत्याही प्रकारच्या पार्टीचे आयोजन केले जाऊ नये. असे असूनही तेलंगणातील नारायणखेड येथील टीआरएस (TRS) चे आमदार एम भूपल रेड्डी यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात मे महिन्याच्या सुरूवातीस साजरा केला. आता तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तेलंगणाचे टीआरएसचे आमदार एम भूपल रेड्डी यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्यात स्टेज देखील लावण्यात आला. ज्यात आमदार रेड्डी मोठ्या खुर्चीवर बसले होते.

कोरोना विषाणूचा धोका असूनही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आमदारांनी आपला वाढदिवस भव्य दिव्य पद्धतीने साजरा केला हे या समारंभाच्या चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

भारतात शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढून 1,18,447 झाले आहे. यासह, देशात आतापर्यंत 3583 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 48,534 लोक कोरोनाचा पराभव करत उपचारादरम्यान बरे होऊन घरी परतले आहेत. आता देशात कोविड- 19 च्या सक्रिय प्रकरणांची संख्या 66330 आहे.