10 वी मध्ये 33 वर्षांपासून इंग्रजी विषयात व्हायचे ‘नापास’, ‘कोरोना’मुळं झाले पास

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संसर्ग लक्षात घेता देशभरात लॉकडाऊननंतर अनेक राज्य मंडळांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. यामुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. पण हैदराबादच्या नुरुद्दीन यांच्यासाठी कोरोना काळ एक संधी म्हणून आला. खरं सांगायचं तर यावर्षी त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली आणि तब्बल 33 वर्षानंतर ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले.

तेलंगणा राज्य सरकारने कोरोना संक्रमणामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादचे मोहम्मद नुरुद्दीन 51 वर्षांचे आहेत. ते सलग 33 वर्षे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेस बसत आहेत. पण गेली 33 वर्षांपासून ते सतत अपयशी ठरत आले परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. यावेळी त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली आणि राज्य सरकारने कोरोना संसर्गामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला.

मोहम्मद नुरुद्दीन देखील त्याच ‘नशीबवान’ ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सामील होते. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी 1987 पासून सतत दहावीची परीक्षा देत आहे. मी इंग्रजीत कमकुवत आहे, म्हणून मी त्यात अयशस्वी व्हायचो. पण यावेळेस मी पास झालो कारण कोविड -19 मुळे सरकारने सर्वांना पास केले आहे.

विशेष म्हणजे कोरोना संसर्गाचा परिणाम या वेळी बोर्ड परीक्षांवर देखील झाला. देशभरात बोर्डाच्या परीक्षांचा काळ असतानाच भारतात हा आजार पसरत होता. त्याचा परिणाम असा झाला की सीबीएसईसह बर्‍याच राज्यात बोर्ड परीक्षा लांबणीवर पडल्या आणि निकालही बऱ्याच काळासाठी लटकले. नंतर परिस्थिती पाहता अनेक राज्य मंडळांनी निर्णय घेतला की यावेळी कोणालाही नापास केले जाणार नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नशीब उजळले.