ट्राय प्रत्येक चॅनलचे दर निश्‍चित करणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहिन्यांसाठी द्यावे लागणारे बिल ग्राहकांना नियंत्रित करता यावे, यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) नवीन नियमांची अंमलबजावणी केली होती. मात्र यातून नक्की कोणत्या ग्राहकांचे हित साधले गेले हा प्रश्नही अनुत्तरित आहे. कारण नव्या नियमावलीनंतर सर्वसामान्य व निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांवर केबलच्या अतिरिक्त शुल्काचा भार पडला. ग्राहकांमध्ये संभ्रम असतानाच आता ट्राय आणखी नवे नियम लागू करण्याचा विचार करत आहे.

नियमावलीत सुधारणा करणार –

‘ट्राय’ने दहा दिवसांपूर्वी आपल्या वेबपोर्टलवरून केबल आणि ब्रॉडकास्टिंग शुल्करचनेसंदर्भात सर्व ब्रॉडकास्टिंग कंपन्या, केबल चालक, डीटीएच कंपन्या तसेच ग्राहकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. या सूचनांचा प्रमुख उद्देश हा केबल टीव्ही प्रसारणासंदर्भात फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या नियमावलीत सुधारणा करणे हा आहे.

ट्रायच्या भूमिकेला व हस्तक्षेपाला ब्रॉडकास्टिंग कंपन्यांचा विरोध-

टीव्ही प्रेक्षक-ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या किंवा हव्या तितक्याच वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य देताना तेवढय़ाच वाहिन्यांसाठी शुल्क भरण्याची मुभा देणारे धोरण ट्रायने फेब्रुवारी 2019 लागू केले होते. सुरुवातीच्या शंभर वाहिन्यांसाठी ठरावीक शुल्क आकारण्यात आल्यानंतर त्यापुढच्या प्रत्येक 20-25 वाहिन्यांवर अधिभारही लागू करण्यात आला. या सूत्रामुळे ग्राहकांना आपल्याला हव्या त्याच वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य लाभेल व त्यांचे केबलचे बिल कमी होईल, असा ट्रायचा दावा होता. मात्र ग्राहकांचे केबल बिल स्वस्त होण्याऐवजी महाग झाले.

वाहिन्या चालवणाऱ्या कंपन्यांनी सर्व वाहिन्यांचे संच बनवून त्या आकर्षक दरांत उपलब्ध करून दिले. कंपन्यांच्या चार लोकप्रिय वाहिन्यांसोबत बाकीच्या दहा न पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्याही या संचामध्ये सामील केल्या. सवलतीच्या दरात हे संच मिळत असल्याचे पाहून ग्राहकांनी असे संच स्वीकारले. वाहिन्यांचे संच करून विकण्याच्या कंपन्यांच्या क्लृप्तीमुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. संचविक्रीतून प्रत्येक वाहिनीला जास्त प्रेक्षकसंख्या असल्याचे दाखवून जाहिरातीही कमावत आहेत. . कंपन्यांकडून सवलतींच्या दरात संच जाहीर करण्यालाही ट्रायचा आक्षेप आहे.

यावर ट्रायने खरंच अशा वाहिनी संचाची गरज आहे का, हा प्रश्न विचारून त्याबाबत सूचना मागवल्या आहेत. ट्रायच्या या भूमिकेला व हस्तक्षेपाला ब्रॉडकास्टिंग कंपन्यांचा विरोध आहे. ट्रायने वाहिन्यांची ही शुल्क पातळी कमी करण्यासंदर्भातही सध्या सूचना मागवल्या आहेत. मात्र, त्याला प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –