‘टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात , परंतु चौकीदार नाही’…!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात परंतु चौकीदार नाही अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. धनंजय मुंडे यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे . ज्यात नीरव मोदी लंडनमध्ये ऐशेआरामात फिरताना दिसत आहे. टेलिग्राफच्या पत्रकाराने हा व्हिडीओ तयार केला असून जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतीक्रिया देतांना दिसत आहेत.

याच मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे . त्यात नीरव मोदीचा व्हिडीओतील फोटो आहे . परंतु त्याला चेहरा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लावला आहे . त्या फोटोवर असे वाक्यही लिहिले आहे की, “तुम्ही नीरव मोदीला भारतात परत कधी आणणार आहात ?” याच प्रश्नाला अनुसरून त्याला उत्तरही दिले आहे. फोटोच्या खालच्या बाजूला लिहिण्यात आले की, “नो कमेंट्स.”अशा प्रकरे नीरव मोदी यांनी पत्रकाराला जे उत्तर दिले ” नो कमेंट्स ” त्या उत्तराचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी त्याच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधाला आहे. इतकेच नाही तर हा फोटो शेअर करताना धनंजय मुंडे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात परंतु चौकीदार नाही.” अशा शब्दात पंतप्रधान मोदींवर धनंजय मुंडे यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणारा, पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरु झाली आहे. त्या व्हिडीओत नीरव मोदीने एक जॅकेट घातलेले दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ‘विजय मल्ल्याला आणण्यासाठी जितका प्रयत्न करत आहोत तितकाच प्रयत्न नीरव मोदीला आणण्यासाठी केला जात आहे. प्रत्यार्पणासाठी गरज असणारी सर्व कागदपत्रे ब्रिटन सरकारकडे सोपवण्यात आली असून , त्यांनी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केलेली नाही. त्यामुळे सध्या आम्ही फक्त त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत’. नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आधीच कल्पना आहे. तो तिथे असल्याची माहिती असल्यानेच प्रत्यार्पणाची विनंती केली होती. नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. ते कॅमेऱ्यात दिसले म्हणून लगेचच त्यांना भारतात आणू शकतोत असे होत नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी  म्हंटले.