पंढरपूर मांस-मद्यमुक्त करण्यासाठी मंदिर समितीचा ठराव

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन

विठुरायाच्या नगरीमधील बाटली आडवी करण्यासाठी आता पुन्हा वारकरी संप्रदायाने जोरदार तयारी केली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत शहरातील मांस तसंच मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला. वारकऱ्यांचीही अनेक दिवसाची होती मागणी.

पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून याठिकाणी मांस आणि मद्य विक्री बंद करावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदाय गेली अनेक वर्षे मागणी करत आहे. फडणवीस सरकारने नव्याने केलेल्या मंदिर समिती पुनर्रचनेत वारकरी संप्रदायाला मोठे स्थान मिळाले आहे. त्यानंतर वारकरी संघटनांनी आज पुन्हा मंदिर समिती बैठकीपूर्वी आपल्या मागण्याची निवेदने मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना दिली होती.

बहुतांश सदस्यांनी वारकरी संप्रदायाच्या मागणीला एकमुखाने पाठिंबा दर्शवल्याने, बैठकीत शहरातील मांस-मद्य विक्रीवर बंदीचा ठराव घेण्यात आला. आता मंदिर समिती हा ठराव शासनाकडे पाठवणार असून समिती अध्यक्ष आणि सदस्य असलेले दोन आमदार त्याचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.