शिवसेनेच्या आमदारानं MIM ला सुनावलं, म्हणाले – ‘मंदिर-मशीद कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी केली होती. त्यावर ‘मंदिर आणि मशीद ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. राज्य सरकार आदेश देईल तेव्हा आम्ही मंदिर सुरु करु’ असा टोला शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांना लगावला आहे.

कोरोना प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीत शिथिलता आणली जात आहे. सोमवारी राज्य सरकारने जिल्हा बंदीचा आदेश उठवून ई पास रद्द केल्याची घोषणा केली आहे. पण मंदिर उघण्याबाबत अद्यापही सरकारकडून स्पष्ट असे सांगण्यात आलं नाही. त्यांचं पार्श्वभूमीवर मंदिर- मशिदी उडण्याची मागणी करत एमआयएम आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने १ सप्टेंबरला मंदिर उघडावीत, नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मशिदी उघडू, अशी मागणी खासदार जलील यांनी केलेली. मात्र, सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने एमआयएमने आजपासून मंदिर उघडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तर मशिदींसाठी उद्यापासून मोहीम सुरु करणार असल्याची माहिती मिळत आहे.

तोच मुद्दा घेत अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मंदिरे उघडण्याची मागणी हा जलील यांचा राजकीय स्टंट’ असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना-एमआयएम आमनेसामने

दरम्यान, खासदार जलील आक्रमक झाले असून, ते शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात आज प्रवेश करणार आहेत. मात्र, मंदिर परिसरात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. मंदिर उघडण्यास शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेना एमआयएम आमने-सामने आली. पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.