भीमा-कोरेगाव ‘विजयस्तंभ’ जागेवर राज्य सरकारचा तात्पुरता ताबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भीमा कोरेगाव हिंसाचार घटनेला येत्या १ जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहे. १ जानेवारीला लाखोंचा भीमसागर भीमा – कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट देतो. मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराची घटना लक्षात घेता यावर्षी भीमा कोरेगाव याठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी याठिकाणी कोणतेही सार्वजनिक भाषण होणार नाहीत अशी माहिती होती. मात्र, आता ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. भीमा कोरेगाव येथे कोणताही अनुचित  प्रकार होऊ नये याकरिता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी १२ जानेवारीपर्यंत या जागेवर सरकारचा तात्पुरता ताबा असावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या अर्जावर विचार करीत हायकोर्टाने मागणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे १२ जानेवारीपर्यंत भीमा-कोरेगाव ‘विजयस्तंभ’ जागेवर राज्य सरकारला तात्पुरता ताबा असणार आहे.
काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण ?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी २०१७) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.
संभाजी भिडे, एकबोटेंना तडीपार करा’ , पुणे पोलिसांकडे निवेदन
भीमा कोरेगाव घटनेला येत्या १ जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षी  झालेल्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भीमा कोरेगाव विजय दिनानिमित्त संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी भीम आर्मी शहर शाखेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी आज (गुरुवार) केली.
मिलिंद एकबोटे यांचे भीमा कोरेगाव कनेक्शन 
दरवर्षीप्रमाणे, १ जानेवारीला पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज येथे दाखल झाला होता. दरम्यान, काही समाजकंटकांनी आंबेडकरी जनतेवर दगडफेक करीत जाळपोळही केली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला होता. दरम्यान, या हिंसाचारामागे हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे या दोघांची चिथावणी असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली आहे. तर संभाजी भिडेंना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यानंतर एकबोटे आणि भिडे समर्थकांनी या हिंसाचारामागे एल्गार परिषदेचे आयोजकच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या परिषदेत चिथावणीखोर भाषणे केल्याचे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.