परभणीत मुलाचा लग्न स्वागत समारंभ महागात ! 10 जणांना ‘कोरोना’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून धार्मिक समारंभ, लग्न समारंभ राजकीय सभा घेण्यावर प्रतिबंध घातले आहेत. असे असताना परभणीच्या गंगाखेड येथील जिनिंग व्यावसायिकाने मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ जिनींगमध्ये घेतला. त्यानंतर याठिकाणी 10 जण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने जिनिंग चालकावर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून लागलेला सर्व खर्च वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील जिनिंग व्यवसायिक राधेशाम भंडारी यांच्या मुलाचा विवाह लातूर येथे झाला. त्यानंतर त्यांनी 28 जून रोजी गंगाखेड येथील त्यांच्या महेश जिनिंग येथे स्वागत समारोह घेतला. समारोप पार पडल्यानंतर यातील 10 जण पॉझिटिव्ह झाले. यानंतर गंगाखेड शहर आणि तालुक्यातील अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मंगल कार्यालय बंद असताना लग्न समारोहास परवानगी नसताना अशा प्रकारे स्वागत समारोह घेतल्याने राधेश्याम भंडारी यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेडमध्ये याकाळात झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लागणारा खर्चही या व्यावसायिकाकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहे. याचीही कारवाई तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like