‘आत्मनिर्भर’ भारतपासून ते ‘कोरोना’च्या वॅक्सीनपर्यंत, PM मोदींच्या भाषणामधील प्रमुख 10 मुद्दे, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचा आज ७४ वा स्वातंत्रदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा दहशतवाद आणि चीनचा विस्तारवाद यावर जोरदार प्रहार केला. तसेच देशवासिय आज अनेक संकटासोबत लढत आहेत. कोरोना, पूर भूस्खलन आदी संकटांमध्ये जीव गमावलेल्या कुटूंबीयांना आम्ही मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासीयांची सेवा केली आहे. त्या सर्वांना नमन करतो असे देखील पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे

१. एकेकाळी आपल्या देशात ज्या वस्तूंची निर्मिती होत असे, त्याचे जगभरातून कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर भारत म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर तयार झालेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. मेक इन इंडियाच्या सोबत आता मेक फॉर वर्ल्ड साठी उत्पादने तयार करायचे.

२. कल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला आहे. जग भारतातील सुधारणा पाहत आहे. म्हणूनच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. कोरोना महामारीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात FDI गुंतवणूक झाली.

३. अनेक शतकांपासून रामजन्मभूमीचा मुद्दा प्रलंबित होता. अयोध्येत १० दिवसांपुर्वी भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरु झाले. शांततामय मार्गाने यावरती तोडगा निघाला. देशातील जनतेचे आचरण अभूतपूर्व होते आणि भविष्यात यामाध्यमातून प्रेरणा मिळत राहील.

४. ‘इज ऑफ लिव्हिंग’ चा मध्यमवर्गाला सर्वात मोठा फायदा झाला. स्वस्त इंटरनेट ते इकोनॉमिकल हवाई तिकीट, हायवे ते आय वे, परवडणाऱ्या दरातील घरे ते कर कपात या सर्व उपाययोजनांचा मध्यमवर्गाला फायदा होणार आहे.

५. कोरोना आला त्यावेळी सुरुवातीस फक्त ३०० चाचण्या देशात घेतल्या जायच्या. पण आता दिवसाला सात लाख चाचण्या करण्यात येत आहेत.

६. आजच्या दिवसापासून ‘नॅशनल हेल्थ मिशन’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला हेल्थ कार्ड दिले जाईल. तुमची चाचणी, आजार याची माहिती त्या कार्डमध्ये असेल.

७. देशातील शास्त्रज्ञ कोरोना संसर्गावर लस विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. भारतातील तीन लस चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दाखवल्यावर मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन सुरु करण्यात येईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचवण्याचा आराखडा तयार केला आहे.

८. दीड लाख ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहचले आहे. वेळेबरोबर प्राधान्यक्रम बदलला आहे. पुढच्या १ हजार दिवसात सहा लाख गावात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहचवणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

९. LOC पासून LAC पर्यंत, ज्याने कुणी भारताकडे डोळे वर करुन पहिले. त्यांना आपण चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या सुरक्षेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश संकल्पित आहे. दहशतवाद किंवा विस्तारवाद असो, भारत ठामपणे मुकाबला करत आहे.

१०. मुलीच्या लग्नाचं कमीत कमी वय किती असावे, त्यावर पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने अहवाल सादर केल्यावर यावर योग्य निर्णय घेतला जाईल.