PM मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील ‘हे’ आहेत 15 प्रमुख मुद्दे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे देशात उद्भवलेली गंभीर परिस्थिती आणि लखाडमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 15 मुद्दे

1. कोरोना ही जागतिक साथ आहे. त्या विरोधात लढताना आता आपण अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत आहोत. पण त्यासोबत आता असा ऋतु आला आहे की ज्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

2. आपल्याला जबाबदारीनं वागावं लागणार आहे. पण जेव्हापासून अनलॉक 1 सुरु झाला तेव्हापासून बेजबाबदारपणा वाढला आहे.

3. अनेक लोक आधी मास्क वापरायचे, वेळोवेळी हात धुवायचे, मीटरभराचे अंतर ठेवायचे. आता मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये जाताना लोकांना बेजबाबदारपणा वाढल्याचे दिसत आहे.

4. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे गंभीरतेने पालन केलं गेलं. आता सरकारी अधिकारी, संस्थांना देशातील नागरिकांना तशाच प्रकारे नियमांचं पालन करून घ्यावं लागणार आहे. त्याच जबाबदारीनं वागावं लागणार आहे.

5. कंटेन्मेंट झोवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. जे लोक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना टोकावं लागेल, रोखावं लागेल आणि समजून सांगावं लागेल.

6. देश असो वा कोणताही व्यक्ती, वेळेवर आणि संवेदनशीलता ठेवून निर्णय घेतल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं बळ येतं.

7. सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनाही आणली, असे सांगून गेल्या तीन महिन्यात 20 कोटी जनतेच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी जमा केल्याचे सांगितले.

8. 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

9. काही दिवसापूर्वी एक राष्ट्राच्या नेत्याला मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. भारतातही आपल्याला अशीच परिस्थिती तयार करायची आहे.

10. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणी नाही. अशा शब्दात त्यांनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.

11. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विस्तार नोव्हेंबरपर्यंत करण्यात आला असून त्यावर 90 हजार कोटी पेक्षा जास्त खर्च होणार आहे.

12. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मागच्या तीन महिन्याचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटी रुपयांच्या घरात जाते.

13. येत्या काळात काळजी घेऊन अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे.

14. लोकलसाठी व्होकल होऊ. आत्मनिर्भर भारतासाठी दिवस-रात्र मेहनत करायची आहे.

15. पंतप्रधानांनी यावेळी चीनच्या विषयावर काहीही भाष्य केलं नाही.