पुणे-नाशिक महामार्गावर खासगी बसची ट्रॉलीला धडक, 10 जखमी

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नाशिक महामार्गावर खासगी बसने उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठिमागून धडक दिल्याने बसमधील 10 जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 6) पहाटे महामार्गावरील चंदनापुरी घाटात झाला. अपघातात जखमी झालेले सर्वजण धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून या अपघातात खासगी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बस (एमएच 18 बीए 7830) पुणे येथून धुळे जिल्ह्यातील शहदा येथे प्रवासी घेऊन जात होती. ही बस संगमनेरच्या पोखरी बाळेश्वरच्या हद्दीत आली असता महामार्गावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकासह बसमधील दहा प्रवासी जखमी झाले असून बसची समोरील बाजूची काच फुटली. तर बसचे इतर मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहूतक काहीवेळासाठी विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.