बाप्पाची आरती करून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रात्री बाप्पाची आरती करून घरी परतत असलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील कुरणपूर गावात ही घटना घडली. दर्शन देठे (वय 10) हे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, 10 वर्षीय दर्शन देठे हा गणपतीची आरती संपल्यानंतर आपल्या चुलती आणि इतरांसोबत घराकडे चाललेला होता. त्यावेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. दर्शनला उसाच्या शेतात ओढत नेले. आरडा-ओरड सुरू झाल्यानंतर परीसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. त्यांनी दर्शनचा उसाच्या शेतात शोध सुरू केली.

उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर गंभीर जखमी झालेला दर्शन हा सापडला. त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दर्शनचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गावात बिबट्याचा वावर असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. याबद्दल वनविभागाला वारंवार माहिती देऊनही कोणतंही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे दर्शनचा नाहक बळी गेला आहे.