Lockdown : 4 महिने घरभाडे थकले, घर मालकाकडून भाडेकरुला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेकांचे पगार कपात झाले तर काही जणांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत घरमालकांनी भाडेकरुकडे घरभाड्यासाठी तगादा लागू नये असे सांगण्यात आले होते. परंतु घरमालकांकडून भाड्यासाठी तगादा लावला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच पुण्यात चार महिने घरभाडे थकवल्याने घरमालकाने भाडेकरूनला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील केशवनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घरमालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी भाडेकरुला मारहाण केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात घरमालकाच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोशन सुरेश पराते (वय-26) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार देवेंद्र सुरेश भाट, नर्गिस भाट, सुरेश भाट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची आई आणि भावासह केशवनगर परिसरात भाट यांच्या घरात मागील चार ते पाच वर्षापासून भाड्याने राहत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्यांचे चार महिन्याचे घरभाडे आणि वीजबिल असे 14 हजार रुपये थकित आहे. यावरून तक्रारदार आणि घरमालक यांच्या वाद झाले. यातूनच आरोपींनी सिमेंटच्या ठोकळ्याने तक्रारदार यांना बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करत आहेत.