शहरात ‘पॅन सिटी’ प्रकल्पासाठी साडे सहाशे कोटींची निविदा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पॅन सिटी’ प्रकल्पांतर्गत सुमारे 650 कोटींची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणारा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हा विभागनिहाय विकास आणि ‘पॅन सिटी सोल्युशन्स’ या दोन घटकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ‘पॅन सिटी’तून इंटरनेट कनेक्‍टिविटी, वायफाय सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा नियोजन आणि ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ यासारख्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे.

[amazon_link asins=’9386349043′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a80d501-858c-11e8-bffb-5108010b78f2′]

पॅन सिटीतून फायबर ऑप्टिक केबलचे जाळे, 300 वाय – फाय स्पॉट करणे, नागरिकांसाठी स्मार्ट किऑक्‍स, सीसीटीव्ही, इंटरनेटद्वारे वाहतूक नियोजन, स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, शहरात स्मार्ट पार्किंगची सोय, स्मार्ट पाणीपुरवठा सुविधा, स्मार्ट जलनि:सारण सुविधा, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट दिवाबत्ती व्यवस्था, पर्यावरणपूरक सुविधा आणि नियंत्रण, कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारणे, जीआयएस ट्रॅकिंग सिस्टिम, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि स्मार्ट सिटी मोबाइल ऍप या सुविधा संपूर्ण शहराला मिळणार आहेत.

शहराच्या विविध भागांत फायबर ऑप्टिक केबलद्वारे इंटरनेटचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी खड्डे (डक्ट) घेण्यात येणार आहेत. भविष्यात नवीन वाहिनी अथवा केबल टाकताना हे डक्ट भाड्याने देऊन महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. या फायबरच्या केबल रस्त्याच्या बाजूला उभारण्यात येणा-या खांबाशी सलग्न ठेवणार आहेत. त्यातून वायफायची सुविधा शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करणे सोपे होईल. साधारण 750 किलोमीटर लांबीचे फायबर नेटवर्क उभारण्यात येणार आहे. याशिवाय नागरी सेवांसाठी किऑस सेंटरमधून माहितीची सुविधा देण्यात येणार आहे. प्रमुख चौक व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे उभारणार आहे. त्याचा उपयोग पालिका प्रशासनासह वाहतूक पोलीस व गुन्हेगारी नियंत्रणासाठी होईल, असेही हर्डीकर यांनी सांगितले.