Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय, महाराष्ट्राला देखील होणार फायदा

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्राने 50 हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी (दि. 15) दिली. या निर्णयाचा महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांना फायदा होणार आहे.

देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने परदेशातून 50 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयातच्या माध्यमातून केंद्र सरकार ही प्रक्रिया पार पाडणार आहे. या ऑक्सिजनच्या क्षमतेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान आदी 12 राज्यांची गरज भागवली जाणार आहे. तसेच केंद्राने राज्य सरकारला आदेश दिले आहे की, ऑक्सिजनचा योग्य आणि सावधानकारक वापर करावा. कुठेही ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. देशात दररोज 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत स्टील संयंत्रात वापरले जाणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा वापरही केला जाऊ शकतो. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने 1100 ते 1300 किमी अंतर पार करावे लागते. त्यामुळे हवाई दलामार्फत ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.