दहावीच्या विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात, ६ गंभीर जखमी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – आज पासून राज्यामध्ये दहावीच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. दहावीच्या परिक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना परत घेऊन जात असताना मोटारीला झालेल्या अपघातात १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा अपघात तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे झाला.

तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा येथे दहावीचे विद्यार्थी घेऊन निघालेल्या वाहनाला छोटा हत्ती टेम्पोची धडक बसली. या अपघातानंतर मोटार पलटी झाली. या अपघातात आदित्य काशिनाथ पाटील (वय १६), आकाश संजय पाटील (वय १६), वेदांत दादासो पाटील (वय -१६), शुभम रमेश भोसले (वय-१६), ऋतुराज आनंदा भंडारी (वय-१६), सुमित सुखदेव गावडे (वय -३५), प्रशांत प्रभाकर पाटील (वय- ३५), लक्ष्मण पवार (वय-४०) जखमी झाले आहेत.

आज दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना सिव्हील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कुमठे हायस्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कवलापुर येथील पंडीत नेहरु विद्यालयात आजपासून सुरु झाली आहे. आज पहिला मराठीचा पेपर होता. गावातील विद्यार्थी मोटारमधुन कवलापुरला आले होते. पेपर संपल्यानंतर सर्वजण घराकडे निघाले होते. तेंव्हा वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला.