Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असल्यामुळे अर्थव्यवहारापासून सर्व काही ठप्प झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांपर्यंत पोहोचवणे, तपासलेल्या उत्तरपत्रिका सरपरीक्षक (मॉडरेटर) आणि विभागीय मंडळाकडे पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा दहावी-बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात 18 मार्चला बारावीची परीक्षा संपली असून भूगोलाची परीक्षा वगळता दहावीची परीक्षाही झाली होती. त्यामुळे प्रत्येक विषयाची परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले होते. शिक्षकांनी उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असल्याचा राज्य मंडळाचा नियम आहे. मात्र, संचारबंदी लागू झाल्यानंतर हा नियम शिथिल करून खास बाब म्हणून यंदा उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली. ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत त्या सरपरीक्षांकडे पोहोचवणे, सरपरीक्षकांनी त्या उत्तरपत्रिका मुख्य सरपरीक्षकांकडे देणे ही प्रक्रिया संचारबंदीमुळे थांबली आहे. उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या तपासून पुन्हा विभागीय मंडळाकडे देण्याचे आव्हान आहे. सोशल डिसटन्सींग पाळून काय करता येईल याचा विचार केला जाईल. तसेच या संदर्भात राज्य मंडळाशीही चर्चा केली जाईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली आहे.