‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में…TATA च्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

पोलीसनामा ऑनलाईन – वाहन बनवणारी देशाची प्रमुख कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) ‘टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी’ (Tata Motors) अकाउंटवरुन केलेले एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत असून यामुळे देशाच्या ऑटो सेगमेंटमध्येही अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र कंपनीने सध्या हे ट्विट डिलिट केले असले तरी चर्चा थांबायचे नाव घेत नाही, अफवांच्या बाजारात मात्र तेजी अजूनही कायम आहे. यामुळे ऑटोसेगमेंटमध्येही विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे या ट्विटमध्ये टाटा मोटर्सने नुकतंच भारतात पदार्पण करणाऱ्या टेस्लाच्या स्वागतासाठी #WelcomeTesla #TeslaIndia अशा हॅशटॅगचा वापर केला होता. याशिवाय टेस्लाचे मालक एलन मस्क यांनाही टॅग केलं होतं.

टाटा मोटर्सच्या त्या ट्विटमध्ये नुकतेच भारतात पदार्पण करणा-या अमेरिकन इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला (Tesla) आणि टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांचा उल्लेख करत एका जुन्या बॉलिवूड सिनेमातील गाण्याच्या काही ओळी लिहिल्या होत्या. त्यामुळे टेस्ला आणि टाटा मोटर्स दोन्ही कंपन्या एखाद्या प्रकल्पावर काम करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. टाटा मोटर्सच्या त्या ट्विटमध्ये 1960 च्या दशकातील शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या ‘ब्रम्हचारी’ सिनेमातील गाण्यात थोडासा बदल करत ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में, सब को मालूम है और सबको खबर हो गई”…असे लिहण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे या ट्विटमध्ये टाटा मोटर्सने टेस्लाच्या स्वागतासाठी #WelcomeTesla #TeslaIndia अशा हॅशटॅगचा वापर केला होता. याशिवाय टेस्लाचे मालक एलन मस्क यांनाही टॅग केले होते. ट्विटमुळे भारतीय बाजारात टाटा आणि टेस्ला यांची भागीदारी होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

टेस्लाच्या भारतातील एंट्रीनंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही तेजी दिसली होती. टाटा आणि टेस्लामध्ये भागीदारी होत असल्याची चर्चा यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात होते. त्यातच टाटाच्या ट्विटची भर पडली, त्यामुळे विविध अंदाज बांधायला सुरूवात झाली. पण आता कंपनीने हे ट्विट डिलिट करत टेस्लासोबतच्या चर्चांवर स्पष्टीकरणही दिले आहे. टेस्लासोबत भागीदारीची अजून कोणती योजना बनवलेली नाही अशाप्रकारच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण कंपनीच्या प्रवक्त्याकडून दिले आहे.