‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच मुलीचे नाव घेत तरुणाने पेटवून घेऊन केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एका अनोळखी तरूणाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील शिवशंकर कॉलनीत घडली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रविवारी (दि. 14) ही घटना घडली आहे. यात 100 टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी तो एका तरुणीच्या नावाने ओरडत होता, प्रेमभंग झाल्याने त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरुणाची ओळख अद्यापही पटली नाही.

जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर कॉलनीतील शिव हनुमान मंदिरामागील गल्लीत एका अनोळखी तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. पेटलेल्या अवस्थेत तो एका तरुणीच्या नावाने ओरडत खाली कोसळला. माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. घटना घडल्यापासून सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नाही. तरुणाचे वय अंदाजे 20 ते 25 वर्ष असावे. त्याच्या अंगावर मरून रंगाचा टी शर्ट आणि काळी जिन्स आहे. डाव्या हातावर इंग्रजीत आकाश अक्षर आहे, तर उजव्या हातावर अश्विनी नावाचा टॅटू काढलेला आहे. उजव्या हातातील एका बोटात खड्याची अंगठी आहे. त्याचा मोबाइलही यात जळाला आहे. या वर्णनाच्या तरुणाला कोणी ओळखत असेल, तर तातडीने जवाहरनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले.