दहशतवादी हल्ल्याची ‘ती’ अफवाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएल सामन्यांच्या दरम्यान मुंबईत खेळाडूंवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे.

वानखेडे स्टेडियमवर आयपीएल मधील सामने रंगणार आहे. मुंबई इंडियन संघ व त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला असतो. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. आयपीएल सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा सुरक्षा एजन्सींनी इशारा दिला असल्याच्या बातम्या शुक्रवारी सर्वत्र झळकल्या होत्या. खेळाडूंना सुरक्षा रक्षकांशिवाय बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या असल्याचे व दोन्ही ठिकाणच्या बंदोबस्तात वाढ केल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले होते.

याबाबत मुंबई पोलीस दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, वानखेडे स्टेडियमला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचा गुप्तचरांनी इशारा दिल्याचे वृत्त अफवा आहे. अशी कोणतीही सूचना आलेली नाही. आयपीएल सामन्यांना मुंबई पोलीस सुरक्षा पुरविते व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पावले उचलली जातात. या अफवांवर विश्वास ठेवू नका.