काश्मीर खोर्‍यातील शांतीमुळं दहशतवादी ‘बावचळले’, दुकानदारांना ‘नकाबकोश’ बंदूकधार्‍यांकडून धमक्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर घाटीमध्ये अशांतता पसरवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात  आहेत. यासाठी फटाक्यांचा वापर तसेच बंदूकधारी इसम दुकानदारांना धमकावताना दिसून येत आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांचा आदर करण्याचे देखील फर्मान काढण्यात येत आहे. 5 ऑगस्टपासून या ठिकाणी हे निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे नागरिकांना धमकावण्यात येत आहे.

याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडयांना अडथळा आणण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर गाड्यांवर पेटते फटाके फेकण्यात देखील येत आहेत. रविवारी आणि सोमवारी देखील दोन तोंड बांधलेल्या व्यक्ती नागरिकांना दुकाने बंद ठेवण्याची धमकी देताना दिसून आले आहेत. मागील आठवड्यात दहशतवाद्यांनी एका दुकानदाराची गोळी मारून हत्या केली होती. त्यामुळे दुकानदारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीर पोलीस या घटनांवर लक्ष ठेवूत असून अशा प्रकारे देश विघातक कारवाया करणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर या लोकांना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न देखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दहशतवादी संघटनांनी तेथील भिंतीवर धमकीचे संदेश देखील लावले आहेत. हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा या संघटनांनी या ठिकाणी हे संदेश लावले आहेत.