मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील सहभागाची पाकिस्तानने दिली पहिल्यांदाच कबुली

इस्लामाबाद : केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला हादरवणार्‍या मुंबईतील 26/11 हल्ल्याबाबत आता आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. या हल्ल्यातील सहभागाची प्रथमच कबुली पाकिस्तानने दिली आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने आपल्या देशातील एक हजारपेक्षा जास्त दहशतवाद्यांची यादी तयार केली असून, या यादीत मुंबईतील 26/11 हल्ल्यात मदत करणार्‍या 11 दहशतवाद्यांचा समावेश आहे. हे 11 जण लष्कर ए तोयबाचे आहेत, अशी खळबळजनक कबुली पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) ने पहिल्यांदाच दिली आहे. या यादीत लष्करे ए तोयबाच्या म्होरक्यांचा समावेश मात्र पाकने केलेला नाही.

हल्ल्यासाठी स्थानिक पातळीवर केली मदत
पाकने ही यादी तयार करताना अनेक म्होरक्यांना जाणीवपूर्वक वगळले असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी पाकिस्तानने ही यादी तयार केल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील ज्या 11 जणांची नावे यादीत आहेत, त्यांनी स्थानिक पातळीवर हा हल्ला घडवून आणण्यासाठी मदत केली होती. हल्ला करण्यासाठी भारतात समुद्रमार्गे जाण्यासाठी बोट खरेदी करणें, त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, त्यांच्या जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणे, अशी सगळी तयारी या 11 जणांनी केली होती.

हे आहेत ते 11 दहशतवादी
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने जी यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये मुंबई हल्ल्यातील मुहम्मद अमजद खान, शाहीद गफूर, अतीक उर रेहमान, रिझ अहमद, मोहम्मद मुश्ताक, मोहम्मद नईम, अब्दुल शकूर, मोहम्मद शाबीर, मोहम्मद उस्मान, शकील अहमद, राहिम यार खान, या दशहतवाद्यांची नावे आहे.

यापूर्वी 26/11 हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने अनेकदा हात वर केले होते. परंतु आता अंतरराष्ट्रीय दबावामुळे तब्बल एक हजार दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. 26/11 हल्ल्यातील अनेकदा पुरावे देऊनही पाकिस्तानने सहभाग असल्याचा इन्कार केला होता. आता ही यादी प्रसिद्ध झाल्याने भारताचा दावा मजबूत झाला आहे.