Chakan News : वाहनांची तोडफोड करत चाकण औद्योगिक परिसरात टोळक्याची दहशत

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन चालकाला अडवून धमकी देत सहा ते सात जणांच्या टोळक्याने चाकण औद्योगिक परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. तसेच पुन्हा इकडे येयचे नाही, अन्यथा हातपाय तोडू, मारुन टाकू अशी धमकी वाहन चालकाला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी म्हाळुंगे येथे घडला आहे.

याप्रकरणी रामदास अंबादास बाराटे (वय-35 रा. म्हाळुंगे ता. खेड) या वाहन चालकाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक असून सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ते जी. ई. कंपनी म्हाळुंगे या कंपनीच्या रोडवरून टेम्पो घेऊन नानेकरवाडी येथे जात होते.

त्यावेळी जी. ई. कंपनीसमोर अज्ञात सहा ते सात जणांच्या टोळक्याने रामदास यांचा टेम्पो अडवला. त्यांच्या टेम्पोच्या काचा फेडून टेम्पोचे नुकसान केले. याशिवाय या टोळक्याने आणखी चार वाहनांची तोडफोड केली. तसेच परत इकडे यायचे नाही, नाहीतर तुमचे पाय तोडू, तुम्हाला घरी येऊन जिवंत मारुन टाकी, परत इकडे गाडी आली नाही पाहिजे, अशी धमकी देत रामदास बाराटे यांना बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.