एप्रिलमध्ये होणार ‘दहावी-बारावी’ची प्रात्यक्षिक परीक्षा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि कोरोनाच्या विविध उपाययोजना करून 10 वी आणि 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळानं सूचना दिल्या आहेत. 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 5 ते 22 एप्रिल, तर 10 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 12 ते 28 एप्रिलदरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं शाळा व महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेत कसोटी लागणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लेखी परीक्षा या एप्रिल ते मेदरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षेची काळजी घेत बाह्यपरीक्षकांची नेमणूक करून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात कोरोनाचे नियम पाळून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य मंडळानं दिल्या आहेत.

यंदा 10 वीच्या परीक्षेसाठी 1 लाख 83 हजार 611, तर 12 वीसाठी 1 लाख 51 हजार 847 अशा एकूण 3 लाख 25 हजार 458 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा सुरक्षित पार पडण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅचचं नियोजन करण्याच्या सूचनाही राज्य मंडळानं दिल्या आहेत, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.