‘कोरोना’ चाचणीत भारताची हनुमानउडी, एकाच दिवसात 9 लाख टेस्ट

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी दररोज कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत आहे. काल भारतात कोरोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला आहे. अवघ्या चोवीस तासात 9 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार काल तब्बल 9 लाख 18 हजार 470 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजवर दिवसभरात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या ठरल्या आहेत. दरम्यान, देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याचा दर घसरला असून तो 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. सातत्याने चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याने पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला आहे. विविध राज्ये सध्या 10 लाख लोकसंख्येच्या मागे दिवसभरात 140 हून अधिक चाचण्या करीत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सुरुवातीला चाचण्यांच्या वाढत्या प्रमाणाबरोबर पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही वाढत होते. मात्र, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबलेल्या उपायोजनांच्या अनुभवावरुन असे लक्षात आले आहे की, करोनाच्या चाचण्या वाढवण्याबरोबरच तत्काळ आयसोलेशन, परिणामकारक ट्रॅकिंग आणि वेळेत वैद्यकीय व्यवस्थान या गोष्टी एकाच वेळी होत असल्याने करोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी होत आहे.