नवलच ! महिलेने ९ मिनिटात दिला ६ बालकांना जन्म 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील टेक्सास मधील ह्युस्टन येथे एक अनोखी घटना घडली आहे. येथे एका महिलेने एकाचवेळी ६ बालकांना जन्म दिला आहे.  खरंतर अशी घटना म्हणजे जगात ४.७ अब्ज लोकांमध्ये एखादीच असते असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या ६ बालकांची तसेच या महिलेची प्रकृती देखील सुव्यवस्थित आहे. थेल्मा असे या महिलेचे नाव आहे.

द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार ४ वाजून ५० मिनिटांनी पहिल्या मुलाला जन्म दिला. पहिले मुल जन्मल्यानंतर थेलमाने पुढच्या नऊ मिनिटात ५ बाळांना जन्म दिला. यामध्ये चार मुलं आणि दोन मुली आहेत. हॉस्पिटलच्या ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार मुलांचे वजन १ पौंड १२ औंस ते २ पौंड १४ औंस च्या दरम्यान आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही हॉस्पिटलने म्हटले आहे. थेलमाने तिच्या मुलींची नावे जीना आणि ज्युरियल अशी ठेवली आहेत. अद्याप तीने तिच्या चार मुलांची नावे ठेवलेली नाहीत.