उद्धव ठाकरे यांनी कशासाठी दिला पुणे पोलिसांना पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक विचारवंतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता पुणे पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

अल कायदा या दहशतवादी संघटनेप्रमाणे एल्गार परिषदेतील विचारवंतांची कार्यशैली आहे. पोलीस, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन सरकार आणि व्यवस्थेचे मनोधैर्य खच्ची करणे ही यांची नीती आहे. या लोकांमुळे देशाविरोधात भयंकर काहीतरी शिजते आहे. मात्र, पोलिसांना यामध्ये आरोपी करणे ही या कटाची सुरुवात आहे, त्यामुळे पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून म्हटले आहे.

 सामुदायिक हत्याकांड, भ्रष्टाचार, हत्या अशा गंभीर आरोपांमधूनही गुन्हेगार सुटतात म्हणून ते निर्दोष असतातच असे नाही. तेलतुंबडेंसाठी छाती पिटणाऱ्यांनीही हे समजून घेतले पाहिजे. तेलतुंबड्यांना अटक केल्याबद्दल पुणे कोर्टाने पोलिसांनाच गुन्हेगार ठरवले. कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित करुन तेलतुंबडेंना सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यांना अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली.

पुण्यातल्या एल्गार परिषदेनंतर राज्यात जातीय विष पेरले गेले त्यामुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली. महाराष्ट्रात असा विखारी जातीय उद्रेक कधीच झाला नव्हता. डॉ. आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी तेल ओतून भडकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र पेटवण्याचा कट नक्षलवादी ऐक्यातून शिजला त्याला कवी, लेखक आणि विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांची डोकी होती. यामध्ये पडद्यामागून तेलतुंबडेंसह वरवरा राव, परेरा, गोन्साल्विस आणि भारद्वाज यांनी सुत्रे हालवली. त्यानंतर यांच्यावर कारवाई झाल्यावर या भंपक बुद्धिवाद्यांनी जणू आभाळ कोसळले, देश बुडाला असा गदारोळ केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना असल्याचे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी सांगतात. हे सहकारी म्हणजे हैदराबादचा ओवेसी आहे. हेच लोक कन्हैयाकुमार, तेलतुंबडे, जिग्नेश मेवानीचे समर्थन करतात. संघ हा प्रखर राष्ट्रवादी आहे. चीन, रशिया, पाकिस्तानात त्यांनी शहाणपण गहाण टाकलेले नाही व आंतरराष्ट्रीय ‘स्कॉलर्स’ची पदवी लावून ते फालतू एल्गार करीत नाहीत. हिंदुत्वाचा द्वेष हाच या मंडळींचा विचार आहे आणि हेच विचारवंत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन देशाची बदनामी करीत आहेत.

बॅ. विनायक दामोदर सावरकर हेदेखील स्कॉलर होते व त्यांनी ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान रचले. त्याबद्दल वीर सावरकरांना आजही दहशतवादी वगैरे ठरवून अवमानित केले जाते. सावरकरसारख्यांनी परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचला होता, पण ‘एल्गार’वाल्यांना स्वतंत्र भारतात उद्रेक घडवायचा होता, हे लक्षात घेतले पाहिजे, असे अग्रलेखात म्हटले आहे.