ठाकरे सरकारकडून ‘मिशन बिगिन अगेन’च्या पुढच्या टप्प्याची नियमावली जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या कालावधीत व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामासाठी तसेच नागरिकांच्या दळणवळणास प्रतिबंध घालू शकतील. लोकांना या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच व्यक्तीगत स्वच्छता या बाबींचे पालन देखील करणे आवश्यक राहील. या आदेशापूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे मार्केटस, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरु राहणार आहेत. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी सुरु राहील.

5 ऑगस्ट 2020 पासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु करण्यास परवानगी आहे. मात्र, या ठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास परवानगी नाही. या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलिव्हरी देण्यासाठी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तू व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरु राहतील. सध्या सुरु असेलेल उद्योग सुरु राहतील. परवानगी देण्यात आलेले सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सूनपूर्व खाजगी तसेच सरकारी कामे सुरु राहतील. होम डिलिव्हरी रेस्टॉरंट आणि किचन सुरु राहतील. ऑनलाईन दुरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधित कामे सुरु राहतील.

सर्व सरकारी कार्यारलये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. सर्व खासगी कार्यालये ही 10 टक्के कर्मचारी किंवा 10 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. स्वयंरोजगार संबंधीत सर्व व्यवसाय सुरु राहतील हे नियम पाळणे आवश्यक

मास्कचा वापर – सार्वजनिक ठिकाणी, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.

सोशल डिस्टन्सिंग – प्रत्येक व्यक्तीने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालक करणे आवश्यक आहे. सार्वजनीक ठिकाणी वावरताना इतरांपासुन किमान सहा फूटाचे अंतर राखावे. ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.

जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर होऊ शकणारे समारंभ, सभा आदिंना यापुढेही प्रतिबंध राहतील. विवाह सोहळ्यात 50 पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधी विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.

सार्वजनीक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमानुसार असलेला दंड लागू राहील. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इत्यादीचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.