Lockdown केल्यास गोरगरीबांना आर्थिक पॅकेज देणार ? CM ठाकरे आज वित्त विभागाशी चर्चा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी दिवसभरात राज्यात तब्बल 60 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असून 350 पेक्षा अधिक रुग्णांनी जीव गमावला आहे. वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्याचा विचार ठाकरे सरकारकडून जवळपास पक्का झाला आहे.

15 एप्रिलनंतर लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊन केल्यास छोटे व्यापारी तसेच दैनंदिन रोजीरोटी कमावणारे गोरगरीबांना काहीसा आर्थिक दिलासा देता येईल का, याबाबतच्या चर्चेसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यावर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात कडक लॉकडाऊन करावा का, याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 11) टास्क फोर्स तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली. त्यात अनेकांनी राज्यात 2 आठवड्यांचा कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान लॉकडाऊन लागू केल्यानंतर इतर राज्यांमध्ये गोरगरीब लोकांना थेट खात्यांमध्ये पैसे दिले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही लॉकडाऊन करायचा असेल तर गोरगरीब लोकांच्या खात्यात थेट आर्थिक मदत करावी. तसेच अन्नधान्य आणि इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे आज होणा-या बैठकीत ठाकरे सरकार याबाबत काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.