देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका; म्हणाले- ‘ठाकरे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील लबाड सरकार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे, असं म्हणत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

‘जनतेच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात वीज कनेक्शन तोडण्यावर स्थगितीची घोषणा सरकारनं सभागृहात केली होती आणि आता सरकार त्यासाठी असमर्थ असल्याचं सांगत आहेत. राज्याच्या जनतेच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं आहे.

‘राज्यातील सामान्य जनता आणि शेतकरी भरडून निघत आहेत’

पुढं बोलताना फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची केवळ नौटंकी सुरू आहे. घोषणा करायच्या आणि नंतर त्यावर मागे फिरायचं. यातून राज्यातील सामान्य जनता आणि शेतकरी भरडून निघत आहेत.

‘महाविकास आघाडी सरकारनं अधिवेशनातून पळ काढला’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विरोधी पक्ष खंबीरपणे आपलं काम करत आहे. सभागृहात अतिशय महत्त्वाच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी येऊन संबोधित करण्याची गरज होती. पण ते आले नाहीत. या अधिवेशनातून महाविकास आघाडी सरकारनं अक्षरश: पळ काढला, असंही ते म्हणाले.

‘सचिन वाझेप्रकरणी सगळे पुरावे एटीएसला देणार’

सचिन वाझे प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेनप्रकरणी माझ्याकडे सीडीआर कसा आला, याची सरकारनं खुशाल चौकशी करावी. मी माझ्या जवळचा सीडीआर एटीएसकडे नक्कीच पाठवणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावादेखील करणार आहे, असंही ते ठामपणे म्हणाले.

‘उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांचे वकील’

फडणवीस असंही म्हणाले, सचिन वाझे यांच्या विरोधात इतके गंभीर पुरावे असतानाही त्यांना पदावरून दूर केलं जात नाही आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री त्यांची बाजू घेत आहेत. हे अतिशय आश्चर्यकारक आहे. सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. कारण मुख्यमंत्रीच त्यांची वकिली करत आहेत, असा घणाघातही फडणवीसांनी यावेळी बोलताना केला.