यंदाच्या दिवाळीत राज्यात फटाक्यांवर बंदी ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी तसे संकेत दिले आहेत. वायू प्रदूषणात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कोरोना रुग्णांवर होतो. त्यामुळं आरोग्य विभाग फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रही आहे. जर प्रदूषणा वाढलं तर श्वास घेण्यास त्रास होतो. कोरोनाचा आजार थेट श्वासाशीच संबंधित असल्यानं यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते. याबद्दलचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.

जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी असेल. राज्याच्या आरोग्य विभागानं हा प्रस्ताव तयार केला आहे. यंदा कोरोना रुग्णांना प्रदूषणामुळं त्रास नको म्हणून आरोग्य विभाग फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रही आहे अशी माहिती आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्ससोबत फटाकेमुक्त दिवाळीबद्दल चर्चा सुरू आहे. यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त असावी यासाठी राजेश टोपे प्रयत्नशील आहेत. त्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत.

राजेश टोपे म्हणाले, “दिवाळीचा सण जवळ आला आहे. कोरोनाचं संकट असल्यानं यंदाची दिवाळी फटाकेमुक्त कशी करता येईल याचा विचार आपण करायला हवा. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आणि मंत्रिमंडळाकडे आग्रह धरणार आहे” असंही त्यांनी सांगितलं.

राजस्थान, सिक्कीम, ओडिशात फटाक्यांवर बंदी

कोरोना संकट आणि दिवाळीच्या काळात प्रदूषणामुळं होणारी वाढ लक्षात घेता काही राज्यांनी फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, सिक्कीम, ओडिशा सरकारनं फटाक्यांवर बंदी आणली आहे. तर दिल्लीनं पर्यावरणपूरक फटाक्यांवर भर दिला आहे.