पोलीस भरतीमध्ये 1600 जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्याचा ठाकरे सरकारचा विचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मराठा बांधव संतप्त झाले आहेत. त्यातच राज्यातील ठाकरे सरकारने मेगा पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरतीला विरोध करत भरती करु नये अशी आग्रही भूमिका घेतली आहे. तर खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर टीका करत मराठा समाजात आक्रोश होईल असा इशारा दिला होता.

मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन राज्य सरकार मेगा पोलीस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, पोलीस भरतीत 13 टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

छत्रपती संभाजीराजेंचाही सरकारला इशारा

महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे, अशा शब्दात राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरु आहे आणि त्यातच राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तरी जर सरकारने ठरवलं पोलीस भरती करायची आहे ते करु शकतात पण यामुळे मराठा समाजात आक्रोश निर्माण होईल. सगळ्यांना सुखानं राहयचं असेल तर वातावरण गढूळ करु नका, मराठा समाजातल्या मुलांनी काय करायचं ? नोकर भरतीला विरोध नाही पण टायमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्यात मेगा पोलीस भरती

राज्यात पोलीस शिपायांची 12 हजार 528 पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एवढी मोठी पोलीस भरती राज्यात पहिल्यांदाच होत आहे. राज्यामध्ये सध्या पोलीस शिपायांची संख्या 97 हजार इतकी आहे. शिपायांमधून पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक 42 हजार, हेड कॉन्स्टेबल 43 हजार आणि एएसआय 20 हजार अशी आहे. नव्या भरतीमुळे सध्याच्या यंत्रणेवरील भार हलका होईल. 2019 आणि 2020 या वर्षात साडेबारा हजार पदे भरण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.