‘ठाकरे सरकारनं थोर महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचं नाव वगळलं’, चंद्रकांत पाटील म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकार दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर करत असतं. यंदाही ही यादी जाहीर करण्यात आली आहे. खास बात अशी की, या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्यानं याबाबत निर्णय घेतला आहे. यंदाच्या यादीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्यानं नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ठाकरे सरकारनं थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव वगळलं आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळानं मला यासंदर्भात आज निवेदन दिलं. आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरू असं यावेळी मी सर्वांना आश्वस्त केलं.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे. सध्या त्यांनी केलेलं हे ट्विट सोशलवर चर्चेत आहे.

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या यादीनुसार, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आता 23 जानेवाराली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, 16 फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, 17 सप्टेंबर रोजी केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि 27 डिसेंबर रोजी डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.