ठाकरे सरकार कधी ‘कोसळणार’ ? नारायण राणेंनी सांगितलं मोठं ‘भाकित’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे खासदार नारायण राणे यांचा निशाणा हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे कायम रहात आले आहे. महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असताना ठाकरे सरकारबाबत नारायण राणे यांनी मोठे भाकित केले आहे.

राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ११ दिवसात हे सरकार पडेल. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का हे माध्यमांनी पहावे पण मला वाटते, हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असे भाकीत नारायण राणे यांनी केले आहे.

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे भाकीत केले आहे.

हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेले नाही. विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासन दिले. पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये आहे. फक्त सत्तेसाठी व पदासाठी एकत्र आलेली ही मंडळी असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.