महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्यात नवा कायदा येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महिला अत्याचारावर आळा घालण्यासाठी ठाकरे सरकार कठोर कायदे आणण्याच्या तयारी आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मसुदा मंजुरीच्या तयारीत असून, येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पारित करणार असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील महिला अत्याचारांना आळा घालणारा एखादा सर्वंकश कायदा असावा, अशी चर्चा सुरू होती. शक्ती असे या कायद्याचे नाव आहे. या कायद्यात अत्यंत कठोर तरतुदीचा समावेश केला आहे.

असा असू शकेल प्रस्तावित शक्ती कायदा
– राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रकरणात 21 दिवसांत आरोपपत्र दाखल करून, खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहाेचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
– महिलांवरील अ‍ॅसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.
– महिलांचा जर ई- मेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मेसेजद्वारे छळ करण्यात आला, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कमेंट करण्यात आली, तर त्यासाठी कडक शिक्षा होणार आहे. यासाठी दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंडाचा समावेश आहे.
– सामूहिक बलात्कार किंवा बलात्कार प्रकरणात दुर्मिळात दुर्मीळ असे जर बलात्कार प्रकरण असेल तर त्यात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.