ठाकरे सरकारला कौशल्य दाखवाव लागणार, ‘हे’ 2 प्रकल्प महत्वाचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा शिवसेना व घटक पक्षांच्या महायुतीचे सरकार असताना ज्या गोष्टींना शिवसेनेने विरोध केला. त्याबाबत निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले सर्व कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. त्यात प्रामुख्याने नाणार प्रकल्प आणि आरे येथील मेट्रो कार शेड या दोन प्रश्नांवर निर्णय घ्यावे लागणार आहेत. गुंतवणुक तर झाली पाहिजे, रोजगार तर बुडता कामा नये व ज्या प्रकल्पाला विरोध केला त्यांचेही समाधान करावे लागणार, अशी तारेवरची कसरत उद्धव ठाकरे यांना करावी लागणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील नाणार येथे हा आशियातील सर्वात मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार असून या प्रकल्पात ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणुक होणार आहे. सुमारे १ लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा तेव्हा सरकारतर्फे करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्यात ३ हजार कुटुंबे विस्थापित होणार आहे. या प्रकल्पाच्या परिसरात नारळी पोफळीच्या बागा असून येथील आंब्याला जगभरातून मागणी आहे.

याशिवाय हजारो मच्छिमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध दर्शविला असून सत्तेत असतानाही आंदोलनाची भूमिका घेतली होती. लोकसभेच्या वेळी शिवसेनेबरोबर युती करताना नाणार प्रकल्पाची जागा बदलण्यात येणार असल्याची भूमिका भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर महाजनादेश यात्रेत मात्र त्यांनी हा प्रकल्प नाणार येथेच होणार अशी घोषणा केली होती. त्यातूनही फडणवीस यांनी शब्द फिरविल्याने शिवसेना नाराज झाली होती.

आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. नाणार प्रकल्पाबाबत त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
राज्यात गुंतवणुक तर आली पाहिजे आणि ३ लाख कोटींच्या प्रकल्पाला विरोध अशी परस्परविरोधी भुमिका यांना घेता येणार नाही. शिवाय या प्रकल्पातून हजारो जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द न करता त्याला पर्याय त्यांना द्यावा लागणार आह शिवसेना आणि भाजपाचे १९९५ मध्ये सरकार असताना त्यांनी एन्रॉन प्रकल्पाबाबत अशीच धरसोड भूमिका घेतली होती. सुरुवातीला त्यांनी प्रकल्प रद्द केला आणि एन्रॉन च्या संचालिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यावर या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्याला मान्यता दिली होती. सरकारच्या धरसोडवृत्तीमुळे त्यानंतरच्या काळात या प्रकल्पाचे तीनतेरा वाजलेच त्याबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणावर वीजटंचाई निर्माण झाली होती. नाणार प्रकल्पाबाबत योग्य सुवर्ण मध्य काढण्याची कौशल्य उद्धव ठाकरे यांना दाखवावे लागणार आहे.

मुंबई मेट्रो ३ साठी आरे येथील अडीच हजाराहून अधिक वृक्षतोड करुन तेथे कारशेड बांधण्यात येत आहे. त्याला शिवसेनेने विरोध केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही भाजपाला विरोध म्हणून किंवा पर्यावरणप्रेमींना पाठिंबा म्हणून या प्रकल्पाला विरोध केला होता. असे असतानाही भाजपाने हा प्रकल्प पुढे रेटून नेला आहे.

झाडांची आता मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे. याशिवाय कार शेडचे कामही मार्गी लागले आहे. आता कारशेडची जागा बदलल्यास प्रकल्पाला उशीर होणार आहे. या प्रकल्पाला विरोध होऊन तो सुरु होण्यास उशीर झाला तर प्रत्येक दिवशी काही कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे यामध्येही लवकरात लवकर मध्यम मार्ग काढाव लागणार आहे. या दोन्ही प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचे समाधान होईल आणि प्रकल्पही मार्गी लागेल, असा निर्णय घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. हे दोन्ही प्रश्न ते कसे मार्गी लावतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com