भाजप नेते अतुल भातखळकरांची ठाकरे सरकारवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारनेही अखेर आज बुधवारी (दि. 28) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. 18 वर्षावरील 5 कोटी 71 लाख नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्याने 1 मेपासून लसीकरण सुरू होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.

आमदार भातखळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण आहे. लसीचा तुटवडा आहे हे रडगाण सुरु ठेवायचे. खासगी रुग्णलायात लस विकतच घ्यावी लागेल हेही सांगायच आणि लस विकत घ्यायला आमच्याकडे लसीच नाहीत असा कांगावाही करायचा. त्यामुळे राज्य सरकारची ही घोषणा लोकप्रियतेची घोषणा ठरेल असे दिसत आहे. राज्य सरकार खुल्या बाजारातून किती लसी विकत घेणार आणि जनतेला मोफत देणार हे त्यांनी जाहीर करावे त्यानंतरच लोकांचा खऱ्या अर्थाने यावर विश्वास बसेल असे भातखळकर यांनी म्हटले आहे.