युवकांसाठी खुशखबर ! ठाकरे सरकारचं मोठं पाऊल, मराठी तरूणांसाठी लॉन्च केलं ‘महाजॉब्स’ वेबपोर्टल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरु झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याशिवाय नवीन उद्योग सुरु करण्यासाठी महापरवाना देणे सुरु केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अकुशल कामगारांची मागणी वाढली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक कामगार स्थलांतरीत झाले आहेत. हे कामगार कधी परत येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगारांचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. यासाठी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरले आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती ‘महजॉब्स’ पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे ‘महजॉब्स’चे लक्ष आहे.

कोठे भरायची माहिती ?

राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने हे पोर्टल राज्य सरकारने सुरु केले आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्हाला माहिती भरायची आहे. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.