देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर सडकून टीका, म्हणाले – ‘अहंकारामुळं मुंबईकरांच्या प्रवासाला खीळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आरे मधील मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यांच्या या निर्णयाचे आरे आंदोलकांनी स्वागत केले. त्यामुळे आरेतील जंगल वाचले असून, मेट्रो कारशेडची गाडी रुळावर येईल, याचाही आनंद असल्याचे त्यांनी म्हटले. तथापि, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आरे येथील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्दैवी असून अहंकारांतून घेतला आहे. तद्वतच कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले असल्याची आठवण फडणवीस यांनी करुन दिली. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कोणाच्या माथी मारु इच्छिते ? आणि कशासाठी ?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कांजूरच्या जागेबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, ‘या जागेस स्थिर करण्यासाठी किमान २ वर्षाचा अवधी अपेक्षित आहे. या कामासाठी आजवर काढण्यात आलेल्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील. निविदा प्रक्रिया पुन्हा राबवाव्या लागतील. जागेच्या फिजीबिलीटी अहवालाबाबत अद्यापही काही माहिती नाही. हा मेट्रो प्रकल्प पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता. मात्र, आता कांजुरची जागा निश्चितीमुळे हा प्रकल्प अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला. आरेच्या ठिकाणी होणाऱ्या कारशेड प्रकल्पावर आधीच ४०० कोटींची रक्कम खर्च झाली. त्यामुळे कांजूरमार्गाच्या निर्णयामुळे ही रक्कम वाया गेली आहे.

आपल्या अहंकारासाठी ठाकरे सरकारने मुंबईकरांच्या प्रवासाला खीळ बसवली आहे. त्यामाध्यमातून हे सरकार नेमके काय सध्या करु इच्छिते ? ही जनतेची मोठी दिशाभूल असल्याचे सांगत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.