देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   महाराष्ट्रात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी ठाकरे सरकारने दहा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. तद्वतच, दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. मात्र, ही मदत अतिशय तोकडी असल्याचे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेलं पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना निव्वळ बहाणे शोधले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. यापूर्वी २५ हजार आणि ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहे.”

“आता सरकारही सूड घेत आहे”

“नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. परंतु, केवळ देखावा निर्माण करुन शेतकर्यां अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करुन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा आणि फसवणूक केली आहे. किमान शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकऱ्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच आहे, आता सरकारही सूड घेत आहे,” असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले आहे.

राज्याचे केंद्राकडून ३८ हजार कोटी येणे बाकी – मुख्यंमत्री

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांना बोलताना मुख्यमंत्री उद्धव म्हणाले, केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहू साठी ६ हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. मात्र, आम्ही हेक्टरी १० हजार रुपयांची मदत देणार आहोत. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टरी ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टरी मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून जवळपास ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळ – एक हजार ६५ कोटी रुपये बाकी, पूर्व विदर्भातील पूर – ८०० कोटी रुपये बाकी आहेत. यासंदर्भात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून, अजूनही पैसे मिळाले नसल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

You might also like