वीज बिलाबाबत ठाकरे सरकार घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळा नागरिकांना भरमसाठ वीज बिलं देण्यात आले आहेत. वाढीव बिलामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. वीज बील कमी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेही आता वीज बील कमी करण्यासाठी तयारी केली आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ऊर्जा बिलाच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून घरगुती वीज बिल माफ करण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. साधारण घरगुती वीज ग्राहक यांना सरासरी वीजबील दरापेक्षा जास्त आले असेल तर त्यात सवलत मिळण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत सादर केला जाणार आहे.

वीज बिल सरासरीपेक्षा जास्त 100 ते 150 युनिट वीज बिल आलेल्या ग्राहकांना वेगवेगळ्या टप्प्यात सूट देत दिलासा देण्यावर कॅबीनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज बिलावर पेटलेल्या वादानंतर घरगुती वीजग्राहकांना वीज बिल दरात सूट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेला आलेल्या वाढीव बिलावरून वीज वीतरण कंपन्या आणि राज्य सरकारने काहीच ठोस निर्णय न घेतल्याने संतप्त मनसे सैनिकांनी काल नवी मुंबईतील महावितरणच्या कार्यालयासमोर आधी वाढीव बिलाची दहीहंडी फोडली. त्यानंतर महावितरणचं कार्यालय फोडून राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता.