फेटा बांधला, नऊवारी नेसली अन् ‘ठाकरे’ चित्रपटाला उपस्थिती लावली 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ या चित्रपटाचे जनतेने दमदार स्वागत केले आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकार्‍यांनी चक्क नऊवारी नेसून आणि भगवा फेटा बांधून हा चित्रपट पाहिला आहे.

ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी आणि शिवसैनिकांना दाखवण्यासाठी शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटिका तथा महिलाप्रमुख सुलभा उबाळे यांनी पहिल्या दिवसाचा पहिला शो बुक केला होता. या शोसाठी त्यांनी शहरातील डॉक्टर, वकील, पत्रकार आणि उद्योजकांना विशेष निमंत्रित केले होते.

शिवसैनिक, तर हा सिनेमा पाहतीलच, असे चित्रपटाचे निर्माते व शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले होते. तो बुद्धीजीवींनाही दाखवा, असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार हा स्पेशल शो आयोजित केला होता, असं उबाळे यांनी म्हटलं. तसंच असेच आणखी स्पेशल शो होतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांनीही मंचर येथे या सिनेमाचा पहिला संपूर्ण शो बुक केला होता.