ढासळत्या वैद्यकीय व्यवस्थेला ठाकरे-पवार जबाबदार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट पुणे शहरात वाढत चालले असून वैद्यकीय यंत्रणा ढासळलेल्या आहेत. याला पालकमंत्री अजित पवार आणि मुख्य मंत्री या नात्याने उद्धव ठाकरे हे दोघेही जबाबदार आहेत असा स्पष्ट आरोप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, स्थानिक लोकप्रतिनिधीं बरोबर कोरोना संदर्भात चर्चा झाल्या. पण, उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यांचं महत्व राजकीय पदानुक्रमात कमी झालं आहे का? की त्यांचं आता कोणीही ऐकत नाही? का असे आहे की परिस्थितीचे त्यांना गांभीर्य नाही? आणि आता मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांचा विशेष हस्तक्षेप असावा असे अजित पवारांना वाटत नाही? राज्याचे एकतृतीयांश कॅबिनेट मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उतरंडीत अजित पवार यांना कदाचित महत्त्व राहिले नसावे असे आम्ही समजावे का? असे आमदार शिरोळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

वैद्यकीय सुविधांचा अभाव जसा आहे तसेच गोरगरिबांना रेशनवर धान्यपुरवठाही पुण्यात व्यवस्थित केला जात नाही अशाही तक्रारी आहेत. या सगळ्या गैरव्यवस्थेला पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्य मंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही जबाबदार आहेत असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.