धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची विधान परिषदेत मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इतर समाजाच्या आंदोलनांप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने आज विधान परिषदेत केली. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा केली. आज विधान परिषदेत प्रश्नोत्तरादरम्यान प्रलंबित धनगर आरक्षण आणि आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. इतर समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतात तर मग धनगर समाजाबाबत असे का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल परब यांनी केली. धनगर समाजाला आरक्षण कधी मिळणार ? या विषयावरून विधान परिषदेत मोठा गोंधळ झाला आणि कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करून भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या सुचनेनुसार सभापतींच्या दालनात याविषयावर महाधिवक्तांच्या अभिप्रायानुसार चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले. याविषयी संबंधित आमदारांनाही बैठकीला बोलवले जाईल. तसेच केंद्राशी याबाबत चर्चा केली जाईल. धनगर समाजासाठी जे काही करण्याची गरज आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.