संक्रांतीला उडणार ‘ठाकरे’, ‘मोदीं’चे राजकीय पतंग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. आता भारतीय सणांना देखील राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे. राजकारणाचा हा रंग आकाशाला सुद्धा येणार असे दिसते आहे. यंदाच्या मकर संक्रांतीला  ‘ठाकरे’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पतंगांचा सामना रंगताना दिसणार आहे. कारण मकर संक्रांती निमित्त यंदा बाजारात दाखल झालेले राजकीय पतंग विशेष आकर्षण ठरत आहेत.

राजकीय पतंगांचे आकर्षण
अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांती आली असून या निमित्ताने विविध रंगांच्या, आकाराच्या पतंगांनी बाजार सजला आहे. यंदा बाजारात आकर्षण ठरत आहे ते ‘राजकीय पतंग’. आगामी निवडणुक लक्षात घेता प्रत्येक पक्ष सज्ज झाला आहे. राजकीय समिकरण, बैठका, सभा, भाषणे यांची रेलचेल सुरू असतानाच सणांचे निमित्त साधत राजकीय पक्ष सर्वसामन्यांच्या अधीक जवळ पोहचण्याचे प्रयत्न करत आहेत. पब्लिसिटी करण्यासाठी राजकीय पक्षांद्वारे विविध शक्कल लढवल्या जात असताना बाजारात मोदींचा फोटो असलेला पतंग दाखल झाल्या आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असा संदेश लिहीलेल्या या पतंग असून प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. मोदींसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या पतंगी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विशेष पतंग बनवण्यात आल्या आहेत. भगव्या रंगाची ही पतंग असून त्याच्यावर चित्रपटाची प्रदर्शनाची २५ जानेवारी तारीख लिहीण्यात आली आहे. मकर सक्रांतीनिमित्त या विशेष पतंग उडवण्यात येणार असून संपूर्ण आकाश भगवामय झालेले दिसणार आहे.